Sunday, June 28, 2020

मंत्रापासून तंत्रापर्यंत ……… भाग 2


    लहानपणी रस्त्यावर खेळणारी हीच मुलं आता मोठी होत होती. नवनवीन विचारांची देवाण-घेवाण करत होतीगावातील क्वचितच कोणा एकाचे आई-वडील ग्रॅज्युएट होते, नाही तर बाकी सर्वांचे दहावी ते बारावी पर्यंत किंवा त्यापेक्षाही खालच्या कक्षेपर्यंत शिकलेले होते.   हव्या त्या उच्च शिक्षणासाठी गावात सोय नसल्यामुळे जिल्ह्याच्या, तालुक्याच्या ठिकाणी धाव घेत होती. घरातही कोणी उच्चशिक्षित नसल्यामुळे आपल्या वाटा आपणच शोधत होती आणि मार्गक्रमण करत होती. शिक्षकांचे मार्गदर्शन होतेच पण सोबतीला आपल्या अगोदर शिक्षणासाठी गावाबाहेर गेलेल्यांचा सल्ला घेत होते.

पिंजऱ्यातून पक्षी उडून जावेत अशी ही मुलं गावाबाहेर पडली संधी मिळेल तेथे आपल्या आवडीचे शिक्षण घेऊ लागली. शिक्षण घेता घेता कोणीकमवा शिका” या मोहिमेचा आधार घेऊ लागले तर बाकीचे आई-वडिलांकडून मिळणाऱ्या पॉकेटमनी वरच खर्च भागू लागली. शिक्षणाबरोबर नवीन अनुभव घेत होते. शिक्षण घेत असेपर्यंत तरी स्मार्टफोन आले नव्हते, त्यामुळे आपापसात गप्पा मारणे, मिळून मिसळून राहणे मैदानी खेळ खेळण्यावरच भर असायचा.

री भेंडीची, दोडक्याची, भोपळ्याची भाजी खाणारी ही मुलं नाईलाजाने का होईना मेस मध्ये खाऊ लागली.  होस्टेलमधील मुलांचा तर वेगळाच दिनक्रम असायचा. अशाप्रकारे बघता बघता आपलं शिक्षण पूर्ण करून ही पिढी आता नोकरीच्या संधी शोधू लागली. सर्वांचे एकच लक्ष होते, पुणे नाहीतर मुंबई. नोकरीच्या शोधात परत सर्वांच स्थलांतर. आता नोकरीच्या निमित्ताने शहरात आलेली हि मुलं जोरात काम करत होती. परिवर्तणाची हि गाडी अशीच अखंडितपणे चालू होती.

गावभर हुंदडणारी हीच मुलं आज स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर गॅजेट वार्‍याच्या गतीप्रमाणे वापरू लागली. हीच मराठी शाळेत शिकणारी मुले आज इंजिनिअर,डॉक्टर, वकील, शिक्षक, व्यापारी, लेखक, कवी व यशस्वी (स्मार्ट ) शेतकरी झालेत व नवनवीन इतिहास रचू लागली.

वय वाढत असल्यामुळे घरच्यांची लग्नाला लगबग सुरु झाली होती. एक एक जण करत विवाहित होऊन मुलाबाळांत रमू लागले. दिवस जात होते तसे तसे आव्हाने वाढत जात होती. आता शिक्षित लोकसंख्या वाढल्याने मार्केटमध्ये कॉम्पिटिशन वाढत चालली होती तशी बेचैनी पण वाढत चालली होती व जॉबच्या संधी कमी प्रमाणात असल्यामुळे बेरोजगारी वाढायला लागली. शिक्षणाचे पहिली जेवढे महत्व होते तेवढे आज काही राहिले नव्हते. “वासरात लंगडी गाय शहाणी” या म्हणीप्रमाणे ही पिढी अजूनही मार्केटमध्ये टिकून आहे

 तंत्रज्ञानाच बोट धरून चालणारी ही पिढी आज पण सशक्त, निरोगी व आत्मनिर्भर आहे. परिस्थिती पुढे न झुकणारी व पाठीचा कणा अजूनही ता असणारी ही पिढी. ही पिढी आज शहरात जाऊन स्थिरावली व तीने नवनवीन यशाची शिखरे गाठली.

मागील पिढीच्या संस्काराची शिदोरी घेऊन आपल्या पुढच्या स्मार्ट जनरेशन बरोबर खांद्याला खांदा लावून जीवन जगणारी ही पिढी. फक्त मुलांनीच नाही तर मुलींनी सुद्धा ‘चू आणि मूल’ यामध्ये न गुंतता विविध क्षेत्रात यश मिळवून शिखरे पादाक्रांत केली. नारीशक्ती चे सशक्त सबळीकरण याच पिढीने खरे अनुभवले. मुलांच्या खांद्याला खांदा लावून नाही तर त्यांच्याही पुढे चार पावले उचलत मुलींनी देशासमोर आदर्श ठेवले. नारी शक्तीला सलाम!!!

 स्वतः आई-बाबा, आई-दादा म्हणणारी आणि गावभर हुंदडणारी हि पिढी आता ५०० स्क्वे फूट च्या घरामध्ये शहरात राहून मम्मी-पप्पा म्हणणाऱ्या स्वतःच्या मुलांच तोंड भरून कौतुक करू लागली. सोसायटी, अपार्टमेंट मध्ये राहतो याचा गर्व बाळगून सिमेंट जंगलांमध्ये वावरू लागली.

मग स्वतःच्या मुलांना आम्ही कसे मैदानी खेळ खेळायचो, आंब्यासाठी झाडावर कसे चढायचो असे सांगू लागली. शहरात राहूनही गावकरी हा शब्द ऐकताच छाती फुगवू लागली. मग त्यात कोल्हापूरकर, सोलापूरकर, सांगलीकर, सातारकर, नगरकर अशी बिरुद घेऊन वावरू लागली. आईच्या हातची भाजी-भाकरी खाणारी मुलं आता पिझ्झा, बर्गर च्या प्रेमात पडली.

 गावात असताना रात्रीला शेतात झोपायला जाणारी मुलं नाईट कँपिंग, बोन फ़ायर च्या नादाला लागली. बरेच काही बदलत होते व हेही स्वतःला त्यात वाहून घेत शहरातल्या गर्दीत मिसळून जात होते. मंत्रापासून ते विविध तंत्रज्ञान हाताळन्यापर्यंत ह्या पिढीने जसे परिवर्तन अनुभवले तशी शेवटचीच ही पिढी ठरावी बहुतेक.

भविष्यातही अनेक आव्हाने येतील व ही पिढी त्यास आरामात सामोरे जाईल व त्यावर विजय निश्चितच मिळवेल अशी आशा बाळगू व प्रार्थना करू….     



कळावे,

आपलाच

श्री विजय रामचंद्र गायके



Read more on-

The Vault of Vishnu- https://amzn.to/3iy32bn


Read More