Monday, June 15, 2020

मंत्रापासून तंत्रापर्यंत ……… भाग 1



               हे शीर्षक जरासं कोड्यात टाकणारे आहे.  अर्थातच शब्दांमधील साम्यता ही एका विशिष्ट पिढीसाठी उपयोगी ठरेल आणि उमजेल ही. एका पिढीचा आजपर्यंतचा प्रवास उघडणारे आहे. अर्थातच जे 1980 ते 90 च्या दशकात जन्मले त्यासाठी विशेषचज्या ज्या प्रसंगातून आणि अनुभवातून ही पुढे पुढे सरकली त्याविषयी काहीकाहींनी सोसले- भोगले तर काहींनी अनुभवले.

            जास्त काही पुराणातील गोष्ट नाही. साधारण 30 ते 35 वर्षांपूर्वीचे गावातील जीवनमान सद्यस्थितीतील शहरातील जीवनमान यातील अनुभव स्पष्टपणे मांडला आहे. 1980 ते 1995 चा हा काळ काही विशेषत तंत्रज्ञान वगैरे साठी प्रसिद्ध राहिला नाही.

गावातील दिवसाची सुरुवात भल्या पहाटे म्हणजेच पाच ते साडेपाच च्या आसपास होत असे.  घरातील गृहिणी (लक्ष्मी) पहाटे उठून आपलं घर झाडून व आंगण साफ करून सडा टाकायची. सकाळी सातच्या आत सर्वजण आंघोळ करून तयार तर आठ ला चहा-नाश्ता होत असे.

            नंतर माय माऊली स्वयंपाकाच्या तयारीला लागायची घरातील कर्त्या माणसाला जेवणाचा डबा तयार करून देत असे. डबा घेऊन शेतकरी माणसं सरळ शेतात निघायची तर खाजगी दुकानात, कारखान्यात काम करणारी माणसं आपापल्या मार्गाने निघायची.

त्यानंतर घरातील आज्जी -आजोबांची पोथी-पुराण वाचण्यासाठी व देवपूजा करण्यासाठी लगबग सुरू असायची. हा नित्यक्रम सकाळी सातला जरी चालू झाला, तरी तो नऊ- साडेनऊ वाजेपर्यंत असायचा.  आजोबा पोथी-पुराण वाचत असताना घरातील सर्व मुले त्यांच्या समोर बसून ऐकायची कमी पण धिंगाणा जास्त घालायची. पोथीपुराण वाचताना शेजारी लावलेली अगरबत्ती संपूर्ण घर धुक्यात टाकायची. आणि तिचा सुगंध घरभर पसरायचा.

गृहपाठ संपवून करून सर्व मुले खेळायला बाहेर पडायची. खेळ तरी काही विशेष नव्हते. मिळेल ती वस्तू यांच्यासाठी खेळणीच होती. सायकलचे टायर, विटी-दांडू, चिखलात सळई रुतवणे, खो-खो, कबड्डी सूर पाट्या अशी नानाविध खेळात ही मुले पारंगत होती. तर मुली, दोरीवरच्या उड्या, जीबल्या, भांडीकुंडी असे खेळ खेळत असायच्या.

शाळेची वेळ होताच दप्तर (School Bag) घेऊन शाळेत जाणं, अभ्यास करणं, दंगामस्ती करणं, डब्बा खाणे आणि शाळा सुटल्याची बेल ऐकताच120 च्या वेगाने घर गाठणे हा दैनंदिन कार्यक्रम असायचा (रविवार सोडून). पाणी पिण्याची सोय म्हणजे शाळेने भरून ठेवलेली पाण्याची टाकी ! त्याच्यातूनच सर्व मुले पाणी पीत असत. त्यावेळेस हे पाणी साफ व शुद्ध आहे की नाही याची शंका ही कुणाच्या मनात डोकावत नव्हती. जेवणाची सुट्टी ही एखाद्या झाडाखाली डब्बा खाण्यात जायची. शाळेत मारामारी ही होत असे आणि नंतर मैत्रीच्या नात्याने गळाभेट ही होत असे.

शाळेत खेळताना पायाला-हाताला जखम झाली तरी त्यांच्याकडे रामबाण इलाज असायचा. शाळेतलं आयोडीन संपलं तरी विटेचा भुगा करून ती पेपरवर चाळून मग ती त्या जखमेवर लावली जायची. विटेचा भुगा लावणारा हा अत्यंत प्रेमाने (अगदी वैद्यराज असल्यासारखा) ती लावायचा. शाळेत मुलांनी तरी आपल्या पालकाला कधी बघितले नसायचे. पालक मास्तर जेव्हा बाहेर भेटतील तेव्हाच सर्व रिपोर्ट घ्यायचे. ना कोणती पालकसभा असायची ना कधी आमची तक्रार घरी जायची.

पर्यावरणाचा तास म्हणजे आमच्यासाठी शाळेतील परिसर साफ करणे हाच असायचा. तस कोणी गवत काढणार, कोणी कागद गोळा करणार तर कोणी टाकून दिलेल्या पिशव्या गोळा करणार. आणि अशातच पर्यावरणाचा संपून जायचा. कारण जिथे स्वच्छता तिथेच आरोग्य असे आम्हाला संस्कार किंवा वळण लावले होते. आमच्या मुलांकडून किंवा मुलींकडून अश्या प्रकारची कामे का करवून घेता? असा प्रश्न एकही पालक विचारत नसे, की कोणी तक्रार देखील करत नसे. त्याउलट मास्तर दिसल्यावर आपल्या पाल्याची अभ्यासातील प्रगती विचारून “ऐकत नसेल तर तुडवा त्याला” अशी विनंती पण करायचे.

मराठी शाळेतच (सरकारी) ही पिढी लहानाची मोठी झाली. शाळेत जमिनीवर सतरंजी टाकूनच यांनी अभ्यास केला ज्ञान संपादन केलं. शाळेमध्ये केवळ ज्ञानच नाही तर संस्काराचे धडे पण दिले जायचे. शाळेतले मास्तर हे सर्वांच्या परिचयाचे. मास्तर कुठे बाहेर फिरताना दिसले तरी त्यांच्यापासून लपणारी ही पिढी. मास्तरांनी मारले (शिक्षेसाठी) तरी ही मुले घरी अजिबात सांगत नसत (कारण त्याच कारणासाठी घरून पण मार मिळायचा) ना कधी मुख्याध्यापकांकडे तक्रार करत नसत.

 आजही शाळेतले मास्तर समोर दिसताच लाज न बाळगता त्यांच्या पाया पडणारी ही पिढी. मास्तरांनी कितीही चोप दिला तरी संक्रातीच्या सणाला तिळगुळ देऊन त्यांच्या कडून आशिर्वाद घेणारी ही पिढी. मास्तरांना दसऱ्याच्या सणाला सोनं (आपट्याची पानं) देण्यासाठी पण यांची झुंबड उठलेली असायची, अशी ही पिढी. मास्तरांनी अनेकांना समजावून तर अनेकांना मार देऊन शिस्त लावली, जी आज देखील दिसते. या शिक्षकांमुळेच ही पिढी आज सुशिक्षित झाली व मोठमोठी पदे मिळवून इतिहास घडवू लागली.

उन्हाळा सुट्टी या पाहुण्यांकडे जा, त्या पाहुण्यांकडे जा….. असं करत संपून जायची. दिवसभर उनाडक्या करणे हा एकच धंदा असायचा. 1 मे ला निकाल लागल्यानंतर गावभर  पेढे वाटणे यांसारखे दुसरे सुख नसायचे. सर्वांना गुणवत्ता पत्रिका दाखवून त्यांचा आशिर्वाद घेउन मग यात्रा घरी येऊन थांबायची.

15 जूनला शाळा सुरू होणार म्हटलं की दहा पंधरा दिवस अगोदरच वह्या-पुस्तके घेण्यासाठी धांदल उडायची. मग त्याबरोबर नवीन पेन पेन्सिल, तपकिरी कागद, दप्तर, डबा, प्लास्टिक कव्हर अशी खरेदी व्हायची. त्याचबरोबर नवीन गणवेश खरेदी केला जायचा. नंतर आणलेल्या पुस्तकांना कव्हर घालणे हा संपूर्ण परिवाराचा छंद असायचा. त्यावर आपल्या नावाचे स्टिकर लावणे हे काम तोच व्यक्ती करीत असे ज्याचे सुंदर हस्ताक्षर असे. कोणतेही नवीन कपडे आणले की त्या कपड्यांना हळदी-कुंकू लावून देवा समोर ठेवून नमस्कार केला जायचा नंतर ते कपडे घालून थोरा-मोठ्यांचा आशीर्वाद घेतला जायचा.

कोणी नवीन सायकल देखील खरेदी केली, तरी चक्कर मारायला लाईन लागायची. पाच, दहा, वीस, पन्नास पैसे सुद्धा जवळ असणे म्हणजे भारी वाटायचं. चार आण्याच्या चार गोळ्या मिळायच्या. जेवणाच्या सुट्टीत शाळेबाहेर बसलेल्या मावशी कडून गोळ्या-बिस्किटे खरेदी करायला झुंबड उठायची. त्या काळात बोरकूट ची तर वेगळीच नशा असायची.

 एक बोरकुट चीपुडी पूर्ण तोंड करून खायची पोर. कोणी चाटत खायचं, कोणी एकदम तोंडात टाकायची. त्याचबरोबर जोडीला राजू ईलायची, दिल्लगी सारख्या सुपारीच्या पुड्या असायच्या.

लँडलाईन हा क्वचितच कोणाच्या तरी घरी असायचा. त्यामुळे शेजारच्या पाच-पंचवीस घरांचा फोन एकाच घरी यायचा. पहिला फोन हा अमुक अमक्याला बोलवा असा असायचा. मग ती व्यक्ती परत 10 मी नंतर फोन करायची व सर्व त्याच ठिकाणी बातचीत होत असे. तो फोन कधी कोणाच्या घरातला असायचा तर कधी कोणाच्या दुकानात. घरात फोन असणं ही फार दुर्मिळ गोष्ट असायची.

 घरामध्ये अध्यात्मिक व सांस्कृतिक वातावरण असायचे. कधी घरात पूजा, होम-हवन चालायचे. मग गणपती, लक्ष्मी, दिवाळी असे सण जोरात साजरे केले जात होते. सर्व देव देवतांच्या आरत्या तोंडपाठ असायच्या. गायत्री मंत्र, शुभंकरोती, पसायदान हे सर्व नित्यनेमाने चालायचे. कोणाच्याही घरी कार्यक्रम असला की शेजारची मंडळी मदतीला धावून यायची. सर्व खाण्या-पिण्याचे पदार्थ घरीच बनवले जात व कॅटरीगवाला हा शब्दच त्यावेळी माहीत नव्हता.

 घरात लहान मुलांचा वाढदिवस असला तर फोटोग्राफरला आमंत्रण दिले जायचे. जास्त फोटो असतील तरच हा फोटोग्राफर घरी यायचा, नाहीतर एक दोन फोटो काढण्यासाठी त्याच्या स्टुडिओमध्ये जावे लागत.

 मग नवीन कपडे, कपाळावर माय माऊली नी लावलेले भलेमोठे कुंकू, हातात फुलांचा गुच्छ, पायात नवीन चप्पल, गळ्यात फुलांचा हार अशीही सवारी सायकलवर अथवा चालत पुढे फोटो स्टुडिओ पर्यंत जायची. थोरा-मोठ्यांना कंबर दुखे पर्यंत दंडवत घालणारी ही पिढी पुढे वाटचाल करू लागली व एकविसाव्या शतकाच्या स्वागताला तयार झाली.

दळणवळणाचे साधन म्हणजे पत्र,तार आणि लँडलाईन एवढंच होतं. राखी पौर्णिमेला बहिणीने भावाला राखी पाठवणे, भावाने बहिणीला, नातेवाईकांना पत्र लिहिणे याच अप्रूप वाटायचं. आलेला पत्र कोण वाचणार? यावरून भांडणं व्हायची व पत्र वाचण्यास शेवटी सुरुवात व्हायची. स. न. वि. वि. पत्रास कारण की…… आणि शेवटी थोरांस नमस्कार, लहानांना आशिर्वाद. कळावे तुमचाच आदरणीय एक्स वाय झेड म्हणून होत असे. घरी आलेली पत्रे, लग्नपत्रिका लोखंडाच्या तारेला अडकवून ठेवली जात असत. अशी तार खुंटीला, नाहीतर माळ्याला अडकवून ठेवलेली असायची.

तंत्रज्ञान विकसित होऊ लागले तसे प्रत्येकाच्या घरी टीव्ही, लँडलाईन फोन येऊ लागले. माणसे एकमेकांशी संवाद साधू लागली. टीव्ही येतात त्यांचे दुष्परिणाम दिसू लागले. बाहेर सतत खेळणारी मुले टीव्हीसमोर तासन् तास बसू लागली. शाळेत तोपर्यंत यावर निबंध येऊ लागले, टिव्ही शाप की वरदान, विज्ञान शाप की वरदान… वगैरे वगैरे. अगोदर हीच मुले माझी शाळा, माझी आई, माझे वडील…..आदी विषयांवर निबंध लिहीत असायची.

एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखू जाऊ लागले जसजसं वय वाढतं तसं परिवर्तन होऊ लागले. हळूहळू मोबाईल फोन आले, त्यानंतर त्यावर मेसेज पाठवता येऊ लागले. तिथपासून ते आज स्मार्टफोन पर्यंतचा प्रवास या पिढीने वीस ते पंचवीस वर्षाच्या आतच पहिला हे विशेष.

अजूनही बरेच काही राहिले आहे लिहिण्यासारखे, आशा करतो की पुढील लेखात ते आपल्या समोर सादर करेल आपल्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करेल. तूर्तास स्वल्पविराम.

 

कळावे,

आपलाच

श्री विजय रामचंद्र गायके


6 comments:

  1. One more good article.. gooo gooo on..

    ReplyDelete
  2. Very Good Article. The Other Side of the Technology/ progress (we got adopted to Machine Life where Relationships are disappeared)

    ReplyDelete
  3. Very Good Article. The Other Side of the Technology/ Progress. (We get adopted to Machine Life where the relationships disappeared)

    ReplyDelete

Thank you for your valuable time and kind words.

Read More