नेहमी प्रमाणे याही वर्षी आम्ही नवीन वर्षाचे स्वागत केलं आणि नवीन वर्षाचे संकल्प सुद्धा अंगीकारले. (अगदी आठवडाभर) असाच गुलाबी थंडीचा मौसम संपवून नुकताच चैत्र महिना तोंडावर आला होता.
सर्वत्र उन्हाळ्याची तीव्रता भासत होती.
भारत देश मात्र हा साखरझोपेत असल्यासारखाच होता. दक्षिणोत्तर देशांनी आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे, याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती.
जात,धर्म, पंथ, रंग-रूप, मन, स्वभाव इत्यादी च्या पलीकडे जाऊन सुद्धा माणसाला ठेवते ती ही भूक.... दक्षिणोत्तर देशातून म्हणे वटवाघळ, साप वगैरे अशा प्राण्यांना खाऊन या मार्गाची सुरुवात झाली. हा हा म्हणता ही महामारी भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली. या प्रकारच्या महामारी चा न कोणाला अनुभव न कोणते शिक्षण. 135 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात या महामारी ने बघता बघता पाय पसरायला सुरुवात केली.
घड्याळातील
चोवीस तासही कमी भासणारी व कोणाच्या बापाला ही न थांबवता येणारी ही दुनिया पूर्णपणे
स्तब्ध झाली. सर्व उद्योगधंदे, कारखाने, शाळा-कॉलेज, रेल्वे, बस, विमान अगदी मोटरसायकल
ही जागच्या जागी खिळून राहिली.
खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने दोन ते अडीच महिन्यासाठी
जमावबंदी लागू केली. भारतासारख्या विकसनशील (मागील पन्नास वर्षापासून तरी हीच स्थिती)
देशात उद्योगधंदे, हॉटेल, चहाच्या टपऱ्या, दारूची दुकाने, मॉल, शाळा-कॉलेज, वाहतूक
आणि रोजंदारी बंद पडल्यामुळे या कामगारांवर (शिक्षित व अशिक्षित) बेरोजगारीची कुऱ्हाड
कोसळली.
माणसाकडून माणसापर्यंत
पोहोचणार्या महामारी ची बातमी ऐकताच गावाकडून शहरात गेले लेकरांना त्यांची माय फोन
करून बोलून घेऊ लागली.
या महामारी पासून जीव वाचवण्यासाठी लोक जीवाची पराकाष्टा करू लागले. पोट भरण्यासाठी शहरांमध्ये स्थलांतरित झालेली मजूर मंडळी मिळेल त्या मार्गाने आपलं गाव गाठू लागली. सरकारही शर्थीचे प्रयत्न करून त्यांना जागच्याजागी थांबू लागली व महामारीची शिकार झालेल्यांवर औषधोपचार करून प्राण वाचवु लागली.
ज्यांच्या जवळ पैसा होतात ती मंडळी मिळेल त्या मार्गे पैसे देऊन गावी जाऊ लागली. कोणी ट्रक च्या टपवर, कोणी बस च्या टपवर, तर कोणी दुधाचा टँकर मध्ये बसून गावी जायचा प्रयत्न करू लागले. त्यातून परराज्यातून जगण्यासाठी आलेल्या कुटुंबांचा तर वेगळाच थक्क करणारा प्रवास. कोणी कुटुंब-कबिला घेऊन 500-1000-2000 किलोमीटरचा चालत प्रवास करत होते तर कोणी सायकलवर स्वार होऊन आपल्या अपंग मातापित्याला घेऊन गावी जात होते.
इकडे शहरात वेगळीच परिस्थिती ! गृहिणींचा सुरुवातीला घरी बसून वेगवेगळे स्वादिष्ट (त्यांच्या मते) खाद्यपदार्थ बनवून खाण्याचा, खाऊ घालण्याचा व स्टेटस ला टाकण्याचा मोह काही आवरता आवरेना. मग असे चमचमीत पदार्थ एक ते दोन आठवडे करून काही गृहिणी मग शेवटी वरण-भात डाळी व कडधान्ये वर घेऊन ठेपल्या.
शिक्षित मंडळी घरून कंप्यूटर-लॅपटॉपवरून काम करू लागली. याचा एक सकारात्मक उपयोग झाला एकविसाव्या शतकात टिकण्यासाठी च्या सर्व तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ लागला व जे वापर करत नव्हते ते सुद्धा ऑनलाइन टिचिंग (शिक्षक) सारखा उपक्रम राबवू लागले.
प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला एकच माहिती होतं की आपलं गाव गाठले तर आपण उपाशी तरी मरणार नाही पण गावाकडं दृश्य वेगळंच होते. गावकऱ्यांनी भीतीपोटी वेशीच बंद केल्या. कोणी वाटेत दगडी टाकली, कोणी दहा-दहा फूट खड्डे खोदले तर कुणी फाटक लावली. शहरातील मंडळींचा अभिमान असलेली हीच गावकरी मंडळी आता शहरी माणसांना गावात येऊ देईना झाली. माणूस माणसाला परका झाला. आपलीच माणसं त्यांना भुतासारखी वाटू लागली.
शहरात रात्रंदिवस काम करून गावाकडे पैसा पाठवणारी
हीच ती माणसं होती जी आज गावकुसाबाहेर एका निवार्याला राहत होती. शहरातल्या माणसापेक्षा
ही उदार मन आणि हृदय असणारी गावची माणसं महामारीमुळे संकुचित विचार करू लागली.
एका ठिकाणी माणुसकी लोप पावत चालली होती तर दुसरीकडे
शहरात माणुसकीची किमया पाहायला मिळत होती. चालत जाणाऱ्या कुटुंबांना मुक्या जनावरांना,
अनाथ बालकांना व वृद्धांना देवदूतांकडून मदतीचा ओघ सुरू होता. कोणी बिस्किट, कोणी जेवण, कोणी औषध, तर कोणी निवार्याची सोय करून देत होते. देव प्रत्यक्षात पाहिला नव्हता, पण
या मदत करणाऱ्या देवदूता मध्ये पहावयास मिळाला. स्वतःचा जीव धोक्यात टाकून ही मायबाप
मंडळी आपलं काम रात्रंदिवस बजावत होती.
इकडे खिशातला
पैसा संपत होता व घरातली खाणारी तोंड कमावत्या धन्याकडे नजर रोखून बघत होती. दोन महिन्यानंतर भूक भागवण्यासाठी कमावती माणसं
घराबाहेर पडू लागली.
इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था होती. जीव मुठीत घेऊन लोक काम करू लागली. हॉटेल्स, रेस्टॉरंट, वाहतूक बंद पडल्यामुळे मिळेल ते व्यवसाय करू लागली. कोणी हॉटेल च्या ऐवजी किराणा दुकान चालवू लागले तर कोणी रिक्षामध्ये भाजी विकू लागले. अशा अनेक तडजोडी करत प्रत्येक जण आपल्या कुटुंबाची भूक भागवू लागले.
या महामारीने एकच शिक्षण दिले की पैसा, गाडी, बंगला अशा कोणत्याच गोष्टी सुखी जीवन जगण्याकरिता लागत नाहीत. या सर्व दिखाव्याच्या व शोभेच्या वस्तू असतात माणसाला माणूस म्हणून पाहण्याची खरी गरज आहे.
उच्च-नीच, काळा-गोरा, जात-धर्म, पंथ या सर्व गोष्टी माणुसकीच्या पुढे निरर्थक आहेत. माणुसकी हाच धर्म म्हणून जगलो तर जग सोन्यासारखे किमती वाटू लागेल.
सरतेशेवटी या मार्गाने आपल्याला माणुसकीचे अगदी जवळून दर्शन मिळाले व निसर्गाच्या अवकृपेचा अवतार दाखवून दिला. मागील तीन पिढ्यांमध्ये अशी महामारी पहिल्यांदाच पहायला मिळाली. निदान यातून तरी मनुष्याने धडा घेऊन भविष्यातील पावले उचलावी हीच अपेक्षा.
कळावे,
आपलाच
श्री विजय रामचंद्र गायके
